नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी आऊटर रिंगरोडवर इंडियन आईल विद्यासर्वो या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी झोपेत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर दुसरा कर्मचारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात पाच आरोपींना अटक केली आहे.
सागर बावरी नावाचा कुख्यात गुंड आणि त्याचा साथीदारांचे हे कृत्य असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, मात्र मुख्य आरोपी सागर बावरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याशिवाय त्याने पेट्रोल पंप येथून एक लाख रुपये चोरून नेल्याची माहिती पुढे आली आहे.
दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर इंडियन आईल विद्यासर्वो पेट्रोल पंपावर दरोडा पडला आहे. आरोपींनी दोन लोकांना ठार मारले आहे, अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले होते.
त्यावेळी एक कर्मचारी मृत झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. यावेळी पोलिसांना या घटनेत सागर बावरी नावाच्या कुख्यात आरोपीचा सहभाग असल्याचे पुरावे मिळून आले, त्यानंतर सागर बावरी आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही. मात्र गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.