नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हलबा समाज आक्रमक झाला आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे, असे बोलून म्हशीला मुख्यमंत्री करत तिच्या कानात पुंगी वाजवून हलबा समाजाने आंदोलन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलबा समाजाला ST मध्ये समाविष्ट संदर्भात दिलेल्या आश्वासानाला 4 वर्ष पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने संतापलेल्या हलबा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यानी आज म्हशीला मुख्यमंत्र्यांची उपमा देत आंदोलन केले. एवढेच नाही तर आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्वासांची आठवण म्हणून म्हशीच्या कानात पुंगी वाजवले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी नागपूर शहरात हलबा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला होता. त्यानंतर शांत झालेले आंदोलन आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी हलबा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या गोळीबार चौकात चक्क म्हशीलाच मुख्यमंत्री करत तिच्या कानात पुंगी कार्यकर्त्यांनी वाजविली. हलबा समाजाला ST मध्ये समाविष्ट करण्याची जुनी मागणी आहे, सत्तेत आल्यास ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.