नागपूर - महानगरपालिकेने सरकारच्या निर्देशानुसार जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्न कार्याला परवानगी दिली आहे. मात्र, हे लग्न सोहळे हॉल, मंगल कार्यालय किंवा सभागृहात करण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
"मिशन बिगीन अगेन" संबंधी निघालेल्या आदेशानुसार जास्तीत-जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत घरी आयोजित होणाऱ्या लग्न कार्याला अनुमती प्रदान करण्यात आली आहे. यासाठी वेगळी कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजवर केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात यायची. मात्र आता 50 वऱ्हाडींची परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने जरी 50 वऱ्हाडी उपस्थित राहण्याची परवानगी दिली असली, तरी शक्यतो कोणतेही समारंभ किंव्हा कार्यक्रम आयोजित करणे टाळावे, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.