नागपूर - येथील प्रसिद्ध अंबाझरी तलावाच्या सांडव्याला अनेक ठिकाणी तडे गेल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज (शुक्रवार) महापौर संदीप जोशी यांनी अंबाझरी तलावाच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत, येत्या 23 ऑक्टोबरला विशेष बैठक बोलावणार आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या कामामुळेही तलावाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे एक संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
शहारातील अनेक वैभवांपैकी महत्त्वाचा वैभव म्हणून अंबाझरीकडे पाहिल्या जाते. मात्र, याच अंबाझरी तलावाची सद्यस्थिती धोकादायक असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी 'ईटीव्ही भारत'ने दिली होती. त्याची दखल घेत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तलावाची पाहणी केली आहे. शिवाय सद्यस्थितीची माहिती घेत येत्या 23 ऑक्टोबरला महानगरपालिकेत या संदर्भात विशेष बैठक बोलावणार असल्याचे संदिप जोशी यांनी सांगितले. या तलावाची सद्यस्थिती पाहता आणि भविष्यातील धोका लक्षात घेता वेळीच नियोजन करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागाला या स्थितीबाबत वारंवार कळविल्या नंतरही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सोबतच तलावाच्या काठाला मेट्रोकडून मलबा टाकल्या जातो. त्यामुळेही धोका निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रिया महापौर संदिप जोशी यांनी दिली आहे.
हेही वाचा - रामाच्या नावाने किती वर्षे राजकारण करणार? शिवसेनेची भाजपवर टीका
तर जलसंपविभाग व मेट्रो यांच्यातील संवाद समन्वय नसल्यानेही या समस्या उद्भवत असल्याचेही जोशी म्हणाले. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बाबत महानगरपालिकेच्या अभियंत्याकडूनही माहिती घेण्यात आली आहे. तसेच मनपा आयुक्तांसोबतही या विषयावर चर्चा झालेली आहे. या सगळ्या बाबींवर जलसंपदा विभाग, मेट्रो आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक बोलावुन तोडगा काढू असेही संदीप जोशी यांनी सांगितले. तर या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.