नागपूर Nagpur Hospital Death : राज्याच्या सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूनं थैमान घातलंय. नांदेडमधील सरकारी रुग्णालयात दोन दिवसांत ३५ जणांचा मृत्यू झाला. तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्ण दगावले. आता उपराजधानी नागपूरच्या रुग्णालयातून रुग्णांच्या मृत्यूची बातमी समोर येतेय.
२४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी महाविद्यालयात (मेयो) गेल्या २४ तासांत २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ तर मेयो रुग्णालयामध्ये ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दगावलेल्या रुग्णांमध्ये विविध वयोगटातील रुग्णांसह काही नवजात शिशुंचाही समावेश आहे. दुसरीकडे, खासगी रुग्णालयातील अत्यवस्थ तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांना मेयो आणि मेडिकल रुग्णालयात रेफर करत येत असल्यानं मृत्यूचा आकडा वाढत असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे.
मेडिकलमध्ये दररोज सरासरी १४ ते १६ रुग्णांचा मृत्यू होतो. अचानकपणे मृत्यूचे आकडे वाढलेले नाहीत. मेडिकल हॉस्पिटल हे मध्य भारतातील सर्वात मोठं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. या रुग्णालयात विदर्भासह शेजारच्या राज्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय खासगी रुग्णालयात शेवटच्या घटका मोजणाऱ्या किंवा खर्च करण्याची शक्ती संपलेल्या रुग्णांना येथं रेफर केलं जातं. त्यामुळे येथे दररोज १४ ते १६ रुग्णांचा मृत्यू होतो. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या औषधांचा स्टॉक उपलब्ध आहे. - डॉ. शरद कुचेवार, अधीक्षक, मेडिकल हॉस्पिटल
नागपूर मध्य भारतातील मेडिकल हब : नागपूर शहर हे मध्य भारतातील मेडिकल हब म्हणून उदयास आलं आहे. शहरात हजारो खाजगी रुग्णालयांसह नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) ही दोन मेडिकल कॉलेज अस्तित्वात आहेत. नागपूरच्या या दोन्ही रुग्णालयात विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील रुग्ण देखील उपचारासाठी येतात.
नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ४८ तासांत ३५ रुग्णांचे मृत्यू झाले. पहिल्या दिवशी १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. आता आणखी चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या ३५ झाली आहे. मृतांमध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे.
हेही वाचा :
- Nanded Hospital Death : नांदेडात मृत्यूचं तांडव सुरुच; रुग्णालयातील मृत्यूची संख्या 35 वर, 16 घरांचा हिरावला आनंद
- Nanded Hospital Death : अस्वच्छता पाहून मला लाज वाटते, रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई - मंत्री हसन मुश्रीफ
- Aaditya Thackeray : 'शासकीय रुग्णालय' मृत्यूचा सापळा बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल