नागपूर - नागपूर लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आले. त्यामुळे झालेले मतदान आणि मत मोजणीतील मते यात फरक आढळून आल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात तीन निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नितीन गडकरी आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावत २३ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे व मतदार मो. नफिस खान यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम दोष पूर्ण असल्याने त्याचा फायदा नितीन गडकरीना झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे गडकरी यांची निवडण रद्द करून नागपूर मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.