नागपूर - नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सुसाट वेगाने वाढत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही उपराजधानी नागपुरात १७०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. आज दिवसभरात १७२७ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात २३,८९२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात कोरोना नवा उच्चांक गाठेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात सर्वाधिक रुग्ण नागपूर येथूनच पुढे येत आहेत. केवळ तीन दिवसांमध्ये नागपूरात ४८७७ रुग्णांची नोंद झाली आहे तर १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसअखेर नागपुरातील एकूण रुग्णांची संख्या ३४४३२ इतकी झाली आहे तर ११७७ रुग्णांच्या मृत्युंची नोंद आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या १७२७ रुग्णांपैकी ३१५ रुग्ण नागपुर ग्रामीण भागातील आहेत तर १४०९ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत.
आज १२२६ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२८८२ इतकी झाली आहे. याशिवाय आज ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नागपूरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ११७७ इतका झाला आहे. सध्या नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६६.४६ टक्के इतके आहे.