नागपूर - राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरूच आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात ज्या वेगाने रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढला आहे, ते पाहता ऑक्टोबर महिन्यातसुद्धा हीच परिस्थिती कायम राहिल्यास काय अनर्थ होईल याचा विचार करूनच सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर काटा येतो.
ऑगस्ट महिन्यात नागपुरात 23 हजार 893 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकताच संपलेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे आकडे काय सांगतात याचा आढावा घेण्यात आला. यावेळी एक लक्षात आले की, ज्या वेगाने नागपूरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, त्याच वेगाने रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातसुद्धा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या 30 दिवसांनंतर नागपुरात तब्बल 47 हजार 10 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे नागपुरातील एकूण रुग्णसंख्या ही 78 हजार 12 इतकी झाली आहे. तर 41 हजार 870 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 63 हजार 467 जणांनी कोरोनावर मात केली आह.
11 मार्च रोजी नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सुरू झालेल्या प्रवास सुरुवातीचे तीन ते चार महिने अतिशय संथ गतीने सुरू होता. त्यावेळी नागरिकांच्या मनात एक प्रकारची भीती होती. मात्र, जुलैमध्ये कोरोना रुग्ण संख्येने वेग धरायला लागला आणि इथेच नागपूरकरांनी चार महिने पाळलेली शिस्त मोडायला सुरवात झाली. नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूंची भीती आता हळू हळू कमी व्हायला लागल्याने लोकं विना कामाने घराबाहेर पडताना दिसू लागले. म्हणूनच सोमवारी नागपूरात कोरोनाने विक्राळ रूप धारण केलेले आहे. नागपूरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक हजाराच्या संख्येने वाढत आहेत. 31 ऑगस्टला नागपूरात रुग्णांची संख्या 29 हजार 555 इतकी झाली होती. तर केवळ 139 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मात्र , सप्टेंबर महिन्यात सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अवघ्या 30 दिवसांमध्ये नागपूरात तब्बल 47 हजार 10 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 42 हजार 870 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केलेली आहे. हे आकडे नक्कीच समाधानकारक असले तरी या काळात रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 245 मृत्यू हे जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. एकूण मृतांची संख्या 2 हजार 510 इतकी झाली आहे.
ज्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत होते ते बघता नागपूर जिल्हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दहा दिवसांमध्ये रुग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाण घटल्याने नागपुरातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती पुन्हा सुधारू लागली आहे. म्हणूनच नागपूरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1 सप्टेंबर रोजी 15 दिवस होता. तो 30 सप्टेंबर रोजी 46 दिवसांवर आलेला आहे. ज्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. या 30 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात 19 हजार 28 चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये 84 हजार 724 आरटीपीसीआर आणि 1 लाख 57 हजार 704 अँटिजेन टेस्टचा समावेश आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या वीस दिवसांमध्ये असलेला वेग शेवटच्या दहा दिवसांमध्ये कमी झाल्याने आता ऑक्टोबर महिन्यातसुद्धा रुग्ण वाढीवर ब्रेक लागेल, अशीच आशा आता नागपूरकर जनता करत आहे.