नागपूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज एक हजाराचा टप्पा पार केला आहे. रविवारी दिवसभरात 31 तर आज सकाळच्या सत्रात 9 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 14 वर पोहोचली आहे तर ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
11 मार्चला पहिला रुग्ण समोर आल्यावर नागपुरात कोरोना रुग्णांचा एक हजाराचा टप्पा गाठायला 96 दिवसांचा कालावधी लागला. नागपूरमध्ये पहिले 100 रुग्ण गाठण्यास 45 दिवसांचा कालावधी लागला होता. जिल्ह्यात 500 रुग्णसंख्या व्हायला 80 दिवस लागले होते. मात्र, पुढील 500 रुग्ण केवळ 16 दिवसात पुढे आले आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्युदर इतरांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ९९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. नागपूरमधील एक हजार रुग्णसंख्येमध्ये शहरातील सतरंजीपुरा, मोमीनपूर,नाईक तलाव-बांग्लादेश, डोबी नगर या भागामधील रुग्णांचे प्रमाण जास्त राहिले आहे. सध्या नागपुरात ३५० पेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने चिंता वाढलेली आहे. त्यात रोज नवीन रुग्णांची भर पडत असल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे देखील वाढतच आहेत.