नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश शहर व ग्रामीण भागातील शाळा अजूनही बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळादेखील ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहे. शहरातील वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एका परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. १४ डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश काही दिवसापूर्वीच आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर शहरातील कोरोनास्थिती लक्षात घेता आता मनपांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत.
कोरोनाच्या धोक्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणाली राहणार सुरू
विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरूच ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला पुढील तारिख देण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय राज्यात व शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता मनपा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
माध्यमिक वर्गाच्या पुरवणी परीक्षा नियोजितच
कोरोनाच्या या काळात माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या सुरू असलेल्या नियोजित पुरवणी परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार असल्याचेही या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे माध्यमिक पुरवणी परीक्षांबाबत कोणत्याही अडचणी येणार नसल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आदेशाचे पालन न झाल्यास होणार कारवाई
दुसरीकडे या निर्देशाचे पालन करणे हे सर्व शाळा प्रशासनाला शक्तीचे करण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा निर्देशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात सांगण्यात आले आहेत. अशावेळी कोरोनाचा वाढता धोका शैक्षणिक स्तरांवर परिणाम करणार ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनदेखील तितकीच खबरदारी घेण्यात येत आहे.