नागपूर - राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरकरांना घरातच राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, या तापमानापासून शहरातील तात्या टोपे नगरातील विघ्नहर्त्याची सुटका करण्यासाठी तेथील भक्तांनी पुढाकार घेतला आहे. या भक्तांनी मंदिराच्या गाभाऱ्यात चक्क कुलरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शहरात वाढत्या तापमानामुळे भक्तांची होरपळ होत असताना बाप्पा मात्र कुलरची हवा खात भक्तांना आशिर्वाद देत आहेत.
भक्तांचे विघ्न दूर करणारा बाप्पाचं संकटात सापडलेला आहे. येत्या तीन चार दिवसात देशात उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. गेल्या ८ दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य नारायण आग ओकतोय, ज्यामुळे संपूर्ण शहर अक्षरशः भाजून निघाले आहे. एवढेच काय तर तापमान वाढीच्या संकटामुळे शहरातील मुख्य रस्ते देखील ओस पडलेले आहेत. सर्वसामान्य जनता उन्हामुळे होरपळून निघत असताना मंदिरात चार भिंतीच्या आत सुरक्षित विसावलेले देवांना देखील उन्हाचे चटके बसू लागल्याने नागपुरातील भक्त मंडळी कासावीस झाली आहे. यावर उपाय म्हणून नागपूरच्या तात्या टोपे नगरातील गणपती बाप्पाच्या मंदिरात भक्तांनी कुलर लावला आहे.
सध्या नागपूरचा तापमानाचा पारा हा ४७ अंश सेल्सिअसच्या वर गेला असताना शहरात उष्माघाताच्या रुग्णामध्ये वाढ होते आहे. बाप्पाचे भक्त असमानी आणि सुलतानी संकटात सापडले असताना विघ्नहर्ता त्यांच्या मदतीला धावण्याऐवजी भक्तांनाच बाप्पाचे विघ्न दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.
विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद -
मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच ४७.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जगातील सर्वाधिक तापमान म्हणून काल चंद्रपूरच्या तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर हा नागपूरजवळील जिल्हा आहे. त्यामुळे नागपुरातही उन्हाचा पारा तीव्र आहे.