नागपूर - अजनी रेल्वे काॅलनी येथील प्रस्तावित वृक्षतोडीवर नागपूर सिटिझन्स फोरमने आक्षेप नोंदवला आहे. फोरमच्या सदस्यांनी महानगरपालिकेतील उद्यान विभागाचे अधिक्षक व वृक्ष अधिकारी यांच्याकडे आक्षेपांचे लेखी निवेदन सुपूर्द केले. यावेळी त्यांना रोपटे भेट देऊन वृक्षसंवर्धनाची आठवण करून देण्यात आली. सिटिझन्स फोरमने आपल्या लेखी आक्षेपांमध्ये प्राणवायूच्या नैसर्गिक स्त्रोतांचे होणारे नुकसान, सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे, मनपाने झाडांविषयी सविस्तर माहिती न देणे, नॅशनल हायवे अथाॅरिटीची भूमिका आणि वृक्षारोपणा, वृक्ष प्रत्यारोपणा संदर्भातील पूर्व इतिहास, पर्यावरणीय मुल्यांकन न होणे, वृक्षांच्या 56 प्रजाती व पक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती अशा विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महापालिकेकडून वृक्षतोडीसाठी परवानगी देणे हे दुर्देवी - अभिजीत झा
शहरातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ज्या महानगरपालिकेवर आहे. मात्र त्याच महानगरपालिकेकडून वृक्षतोडीसाठी परवानगी देणे हे दुर्देवी असल्याचे फोरमचे सदस्य अभिजीत झा म्हणाले आहे. मनपाने दिलेली जाहिरात तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. लोकांनी वृक्षारोपण करून झाडे जगवावी यासाठी महानगरपालिका आपल्या प्रत्येक कार्यक्रमात रोपटी भेट म्हणून देते दुसरीकडे तिच महानगरपालिका वृक्षतोडीसाठी जाहिरात कशी काय काढू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबतीत प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.
विकास उठला पर्यावरणाच्या मुळावर
अजनी रेल्वे काॅलनीतील वृक्षतोडीला नागरिकांचा विरोध होत असतांनाही हा विरोध झुगारुन वृक्षतोडीसाठी पाऊले उचलणे लोकविरोधी असल्याचे फोरमचे सदस्य अमित बांदूरकर यांनी म्हटले आहे. शहरातील सर्वपक्षीय जनप्रतिनीधींना घेराव घालून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी बाध्य करू, असा इशारा त्यांनी दिला. आयएमएस प्रकल्पासाठी पर्याय उपलब्ध असतांना शहराच्या मधोमध हा प्रकल्प आणून पर्यावरण नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
नितीन गडकरींचे ट्विट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी अजनी येथे तयार होणाऱ्या इंटर मॉडेल स्टेशन संदर्भात एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट ४४.४ एकर जागेवर प्रस्तावित असल्याचे म्हणाले. त्याठिकाणी ४५२२ झाडे असून त्यापैकी २०२३ झाडे वाचवले जाणार आहेत, त्यांना कॉनकॉर थेट लागले जाणार असून ज्या झाडांची कत्तल होणार आहे त्यांच्या संख्येच्या पाच पट झाडे हे शंकरपूर या भागात लावण्यात येतील असेही ते म्हणाले.