नागपूर -जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. केवळ 4 महिन्यांकरिता आमदार निवडायचा असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशा आशयाची एक याचिका संदीप सवयी यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने काटोल विधानसभा पोटनिवडणुकीत स्थगिती दिली आहे
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काटोल विधानसभेची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात घेण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला होता. ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरनिवडून येणाऱ्या आमदाराला केवळ ३ ते ४महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी याचिका संदीप सवयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि पुष्पा गानेडीवाला यांच्या खंडपीठात समोर सुनवाई करताना ही निवडणूक प्रक्रिया पुढील २ आठवड्यांकरिता स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात या विषयावर उत्तरे देण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत