नागपूर - पोळ्याच्या पाडव्याला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या पांढुर्णा आणि सावरगाव दरम्यान गोटमारीचा जीवघेणा खेळ खेळण्याची परंपरा आहे. पोळ्याच्या पाडव्याला गोटमारीचा हा खेळ कित्येक वर्षांपासून खेळला जातो. या गोटमारीत आतापर्यत अनेकांचा जीव गेला असून शेकडो जणांना अपंगत्व सुध्दा आले आहे. यावर्षी सुद्धा परंपरे नुसार गोटमारीचा खेळ खेळण्यात आला. यामध्ये पाचशे पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत, तर तीन जण गंभीर असल्याची माहिती आहे. यावर्षीचा सामना अनिर्णित राहिला आहे.
असा खेळला जातो गोटमारीचा खेळ-
पोळ्याच्या पाडव्याला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमेवर असलेल्या पांढुर्णा येथे होणारी पारंपरिक गोटमारीचा अतिशय घातक खेळ संपन्न झाला आहे. दोन्ही गावांच्या मधून जाम नदी वाहते. नदीच्या पत्राच्या अगदी मधोमध एक झेंडा रोवण्यात येतो. ज्या गावाचे ग्रामस्थ तो झेंडा तोडतील ते गाव या खेळात विजयी झाल्याचे मानले जाते. खेळ सुरू होताच नदीच्या दोन्ही बाजूला असलेले गावकरी दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करतात. मात्र झेंडा तोडण्याच्या नादात दगडगोटे लागून अनेक स्पर्धक ग्रामस्थ यात जखमी होतात.
यंदाही कोरोनाच्या सावटाखाली हा गोटमारीचा सामना खेळण्यात आला. यामध्ये शेकडो ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी कोणत्याही गावातील नागरिक झेंडा तोडण्यात अपयशी ठरल्याने अखेर सामना अनिर्णित राहिला आहे.
३०० वर्षांची परंपरा-
गेल्या ३०० वर्षांपासून पांढुर्णा आणि सावरगाव मध्ये गोटमारीची परंपरा आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. मात्र लोकांनी प्रतिबंध झुगारून गोटमार केली होती.