नागपूर : मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस व्हावा, यासाठी पोषक परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली नव्हती. त्यामुळे विदर्भात सरासरीपेक्षा तब्बल २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र १७ जुलैनंतर पुन्हा बंगल्यात उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर विदर्भात सर्वदूर दमदार पावसाचे आगमन होईल, अशी माहिती मोहनलाल साहू यांनी दिली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटी पावसाची तूट भरून निघेल - हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू
दमदार पावसाचा अंदाज: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो मात्र, जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. त्यानंतर आता जुलै महिन्यात देखील कमी पाऊस झाला आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या 10 ते 12 दिवसात चांगला पाऊस होईल आणि सध्या निर्माण झालेली तूट भरून निघेल, अशी माहिती साहू यांनी दिली. तर ऑगस्टमध्ये सर्वदूर दमदार पाऊस होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस: १ जून ते १५ जुलै दरम्यान विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला आणि कितीची तूट निर्माण झाली आहे, यावर एक नजर टाकू या. अकोला जिल्ह्यात आत्तापर्यंत २३५ (मिमी) पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १३४ (मिमी) पाऊस झाल्याने अकोल्यात ४३ टक्के कमी पाऊस पडला आहे. अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत २६४ (मिमी) पावसाची नोंद व्हायला पाहिजे होती. परंतु आत्तापर्यंत १९३ मिलिमीटर पाऊस झाला आहे, त्यानुसार अमरावतीमध्ये २७ टक्के कमी पाऊसाची नोंद झाली आहे. भंडारामध्ये ३३३ (मिमी) पाऊस पडला असून सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पाऊस झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात २६ टक्के कमी पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत येथे २१८ (मिमी) पावसाची गरज होती, परंतु केवळ १६१ (मिमी) इतकाच पाऊस कोसळला आहे. तर चंद्रपूरमध्ये आत्तापर्यंत ३५० (मिमी) पैकी २२६ (मिमी) इतकाच पाऊस झाला असून तेथे देखील ३६ टक्के पावसाची तूट आहे. शेजारी असलेल्या गडचिरोलीत देखील ३३ टक्के कमी पाऊस झाल्याने भाताचे पीक घेणारे शेतकरी काहीसे चिंतेत आहेत. गडचिरोलीत १ जून ते १५ जुलै दरम्यान ४०२ (मिमी) पावसाची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात २७० (मिमी) इतक्याच पावसाची नोंद झाली आहे.
गोंदिया आहे नशीबवान : या सर्व जिल्ह्यात गोंदिया जिल्हा मात्र नशीबवान ठरला आहे. येथे एकही टक्के पावसाची तूट नाही. गोंदियामध्ये ३६६ (मिमी) पावसाची आवश्यक होती. वरुण राजाने या जिल्ह्याची ती आवश्यकता पूर्ण केली आहे. नागपुरात १७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगमन झाल्यानंतर ते आजपर्यंत नागपुरात ३०८ (मिमी) पावसाची आवश्यकता होती. परंतु केवळ २५६ (मिमी) इतका पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यात तर ३५ टक्के, वाशीममध्ये ३१टक्के व यवतमाळात २५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
हेही वाचा -