नागपूर - देशाला वैभव संपन्न बनवायचे आहे. त्यामध्ये माझे किंवा कुणाचे श्रेय आहे, हा प्रश्नच उद्भवत नाही. समाजाने हे कार्य संपन्न करण्यासाठी योग्य बनावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाचा नवोत्साह २०२० हा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
आम्ही स्वतंत्र झालो. राजकीय दृष्टीने खंडित होवून का होईना, पण स्वतंत्र झालो. मात्र, आता ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे. स्वयंसेवकानी सुद्धा ते आपल्या कामातून दाखवले पाहिजे. त्यामधूनच संघाचे काम समाजाला कळेल, असेही मोहन भागवत म्हणाले.
भारताचे संविधान देताना आंबेडकरांनी सांगितले होते, की 'आता जे होईल त्यासाठी आपण जबाबदार असणार आहोत. फक्त आपला विचार न करता समाजाचा विचार व्हायला पाहिजे. विश्वाला मानवता देणारा भारत आम्हाला बनवायचा आहे.' त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे, असेही भागवत म्हणाले.
आज केलेला अभ्यास स्वयंसेवक रोज एक तास करतात. देशभावनेमधूनच मनुष्य निर्माणाचे कार्य साध्य होते. आपल्या राष्ट्राला वैभव संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. मात्र, त्यात श्रेयवाद निर्माण न होता हे कार्य समाजाने करावे, असे भागवत म्हणाले.