नागपूर - केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. नागपूरमध्येही उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहे. या सात वर्षात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहेत. तसेच या सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण न केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाची स्थिती सांभाळण्यात मोदी सरकार अपयशी -
मनमोहन सिंहांच्या सरकारमध्ये रुळावर असलेली अर्थव्यवस्थावर मोदी सरकारच्या काळात डबघाईस आली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले आणि या काळात लाखो लोकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाची स्थिती सांभाळण्यात हे मोदी सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाचे संकट घालवण्यासाठी लोकांना दिवे लावायला लावणाऱ्या मोदींनी देशाचा दिवा मात्र विझवला असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने कोरोनाबद्दल सरकारला इशारे देत होते; परंतु याकडे सरकारने दुर्लक्ष केले. याची मोठी किंमत देशाला मोजावी लागत असल्याचेही ते म्हणाले.
वर्धापनदिनानिमित जनतेचा आक्रोश त्यांच्या कानावर पडावा -
उद्योग, कृषी, शिक्षण, रोजगार, महागाई, जीडीपी आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. या सात वर्षात त्यांच्या प्रगती पुस्तकावर पुन्हा एकदा नापासचा शिक्का उमटला असून गेल्या दीड वर्षात कोरोनाकाळात त्यांनी देशातील जनतेला शब्दशः वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. मोदी सरकारच्या सातव्या वर्धापनदिनानिमित जनतेचा आक्रोश त्यांच्या कानावर पडावा, यासाठी आम्ही काही प्रश्न विचारत आहोत, असेही राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा - पंडित नेहरु, गांधींच्या पुण्याईवर देश चालतोय, मोदींनी आत्मचिंतन करावे - संजय राऊत