नागपूर - जिल्ह्यातील कोतीलमारा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. एकीकडे मोबाईल ही माणसाची गरज असताना पारशिवणी तालुक्यातील कोतीलमारा गावात मोबाईल नेटवर्कच नाही. नागरिकांना फोन करायला चक्क ४० किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे. त्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील गावातच डिजिटल इंडियाचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळत आहे.
इंटरनेट ही सेवा देखील ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय योजना, तरुणांना रोजगार संधीची माहिती देखील मिळत नाही. तालुक्याला जोडणारे रस्तेदेखील कच्चे आहेत. कोतीलमारा गाव व्याघ्र वन परिक्षेत्राअंतर्गत येते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फोन करायलाही ४० किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. वन्यप्राण्यांची भीती असताना देखील लोक जीव मुठीत घेऊन जातात. म्हणून नागरिकांमध्ये संताप आहे.
इंटरनेट नसल्याने तरुण वर्गाला रोजगाराबद्दल माहिती मिळत नाही. इतकेच नव्हे तर गावातील कुणाच्या अंतिम विधीसाठी नातेवाईकांना फोन लावू शकत नाहीत. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत या गावाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, डिजिटल इंडिया अभियानात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यतील गावच मागे असल्याचे चित्र आहे.