नांदेड : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून नांदेडची निवड केली आहे. जानेवारीत होणारी ही सभा शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या ५ फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात केसीआर पहिली सभा घेणार असल्याची माहिती आहे.
पक्ष विस्ताराला नांदेडमधून सुरूवात : महाराष्ट्राच्या सीमेवरील धर्माबाद, बिलोली, देगलूर, माहूर, किनवट या गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेलंगाणात मिळणाऱ्या योजनांची भुरळ या गावांना पडली आहे. तेलंगणानेही या गावांना सामावून घेण्याबाबत हिरवा कंदील दिला होता. मध्यंतरी त्यासाठी कृती समितीने संवाद संपर्क अभियानही राबविले होते. परंतु या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बीआरएसचे आदिलाबादचे खासदार गडुम गणेश यांनी किनवट आणि माहूर तालुक्यांना याआधी भेटी दिल्या होत्या. मुख्यमंत्री केसीआर यांची पहिली सभा नांदेडमध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी बीआरएसचे काही पदाधिकारी गेल्या महिन्यात नांदेडमध्ये आले होते. त्यांनी सभेसाठी काही जागांची पाहणीही केली होती.
बीआरएसचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश : जानेवारीत बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेशाचा मुहूर्त ठेवला होता. परंतु मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे त्याला खोडा बसला. टीआरएसचे बीआरएस असे नामकरण केल्यानंतर मुख्यमंत्री केसीआर यांना पहिली सभा नांदेडमध्येच घ्यायची होती. परंतु १८ जानेवारी रोजी त्यांनी खम्मम येथे ही सभा घेतली. या सभेला देशभरातील अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर केसीआर यांनी आपला मोर्चा पुन्हा नांदेडकडे वळवला आहे. ३ फेब्रुवारीला तेलंगणाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
बीआरएसमध्ये दोन मतप्रवाह : बीआरएसच्या काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांऐवजी थेट विधानसभा आणि लोकसभा लढवाव्यात, असे मत व्यक्त केले आहे. तर दुसऱ्या गटाकडून वेगळी मते मांडण्यात येत आहेत. महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढविल्यास पक्ष मजबूत होईल आणि त्याचा विधानसभा आणि लोकसभेला निवडणुकांना फायदा होईल, असा मतप्रवाह आहे.
तेलगू भाषिकांची जुळवाजुळव : तेलगू भाषिकांची जुळवाजुळव करण्याची पक्षाची तयारी आहे. त्यासाठी राजुरा, भोकर, नांदेड, नायगाव, देगलूर, मुखेड, धर्माबाद, बिलोली यासह किनवट आणि माहूर तालुक्यातील तेलगू भाषिकांना पक्षात सामावून घेण्याबाबत काही नेत्यांनी चाचपणी केली आहे. त्यासाठी इंद्रकिरण रेड्डी आणि जी. विठ्ठल यांना पाठविण्यात आले होते.