नागपूर : न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावरुन तातडीने शुक्रवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा सुरू आहे.
पाच तास मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा : सत्ता संघर्षाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. सुमारे पाच तास मंत्रिमंडळ संदर्भात पक्ष श्रेष्ठ सोबत चर्चा केल्यानंतर ते पहाटे नागपूरला परतले आहेत.
येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळ विस्तार : सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. त्यामुळे गेल्या ११ महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठ दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यातील कुणाला संधी द्यावी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठीमध्ये सखोल चर्चा झाली आहे.
रात्री दिल्ली सकाळी नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केल्यानंतर ते रात्री तीनच्या दरम्यान नागपूरला परत आले आहेत.
फडणवीस दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्या प्रत्येक मतदार संघांमध्ये जाऊन तालुक्याची आढावा बैठक घेत आहेत. शासकीय योजनांची संपूर्ण माहिती खालपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना गती आली पाहिजे त्यासाठी हा आढावा घेत आहेत. या काळात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील चार मतदार संघाचा आढावा घेतला असून आज देवेंद्र फडणवीस दोन मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.
आमदार बच्चू कडू यांनी दिले संकेत : आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत नुकतेच दिले होते. आता राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. कदाचित 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली होती. आमदार बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे नेते असून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याच आग्रहानुसार राज्यात नवीन दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वाटत असताना त्यांना मंत्रिपद दिले गेले नव्हते. मात्र आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -