नागपूर - शहराचे वैभव, अशी ओळख अंबाझरी तलावाची आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरुस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे. तसेच तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. शहराचे वैभव जपताना नागरिकांची सुरक्षाही अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने तलावाच्या बळकटीसंदर्भात आवश्यक कार्यवाही त्वरीत सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले आहेत.
अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसंदर्भात आज महापौर संदीप जोशी यांनी मेट्रो, सिंचन विभाग व महापालिकेची संयुक्त बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्दश दिले.
अंबाझरी तलावाची पार आणि ओव्हरफ्लोची भिंत अत्यंत जुनाट असल्याने पुढील धोका रोखण्यासाठी तलावाच्या बळकटीकरणाचे कार्य लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी एकूण 28 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून नागपूर महानगरपालिका, मेट्रो आणि सिंचन विभागाच्या माध्यमातून संयुक्तरित्या हा खर्च करण्यात येणार आहे. तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व बळकटीकरणाचे कार्य सिंचन विभागाकडून केले जाणार आहे. यासंबंधी येणारे अडथळे आणि त्रुट्या तातडीने दूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्याकडे लक्ष देण्याचेही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी निर्देशित केले.
याशिवाय तलावाच्या परिसरातील धोकादायक ठरणारी झाडेही कापणे आवश्यक आहे. यादृष्टीनेही सर्व प्रक्रिया पूर्ण करून कार्य सुरू करण्याचे त्यांनी निर्देश दिले. अंबाझरी तलावाजवळ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधकामादरम्यान उपसण्यात आलेला मलबा टाकल्याने तलावानजीकचे स्वामी विवेकानंद स्मारकाचा परिसर विद्रुप दिसत आहेत. शिवाय हा मलबा तलावासाठी धोकादायक ठरु शकतो. हे लक्षात घेता मेट्रोने तातडीने मलबा हटवावा, असेही निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
हेही वाचा - धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साजरा करा, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन