नागपूर - लॉकडाऊन होणार की नाही, या मुद्यावरुन नागपुरात राजकीय तेढ निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात काहीही झालं तरी लॉकडाऊन होऊ देणार नाही, जर प्रशासनाने लॉकडाऊन केलाच तर या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरू, अशी भूमिका महापौर संदिप जोशी यांनी घेतली आहे. शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन महानगरपालिकेत जनप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जनप्रतिनिधींकडून हा निर्णय झाल्याचे महापौर संदिप जोशी यांनी सांगितले.
नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करायचे की नाही, यावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊन करायचे की नाही, यासाठी महानगरपालिकेत जनप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, दुसरीकडे याच मुद्यावरुन पालकमंत्र्यांनी सुद्धा विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावल्याने पालकमंत्री कोरोनाच्या काळातही राजकारण करत असल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला.
आम्हाला विश्वासात न घेता दुसरीकडे बैठक बोलावून पालकमंत्र्यांना काय सिद्ध करायचे आहे, असा सवालही यावेळी संदिप जोशी यांनी उपस्थित केला. पालकमंत्री हे अतिशय घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही महापौरांनी केला. त्याचबरोबर काहीही झाले तरी शहरात लॉकडाऊन होऊ देणार नाही. शिवाय लॉकडाऊन झाल्यास रस्त्यावर उतरत निर्णयाला विरोध करणार असल्याचे संदिप जोशी यांनी सांगितले. या बैठकीबाबत पालिका आयुक्तांना कल्पना असताना देखील ते उपस्थित का राहिले नाही, असा सवालही संदिप जोशी यांनी उपस्थित केला.
शिवाय लॉकडाऊनच्या काळात आधीच लोकांच्या हातांना काम नाही. अशात पालिका आयुक्तांकडून अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. हे अत्यंत चुकीचे असल्याचे यावेळी संदिप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे ज्या बाबींची गरज शहराला आहे ते द्या, विनाकारण सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, असेही जोशी यांनी सांगितले.
यावेळी ही बैठक पूर्ण होवू न शकल्याने पुन्हा ७ आॅगस्टला ही बैठक होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. या बैठकीला भाजपचे आमदार व जनप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीमधून सर्व जनप्रतिनिधीचे मत घेऊनच शहरात लॉकडाऊन होऊ देणार नाही, असेही महापौर संदिप जोशी यांनी सांगितले.