नागपूर - माझ्या भावाने देशासाठी जीवाची बाजी लावली याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र भाऊबीजेच्या दिवशी भावाला अखेरचा निरोप द्यावा लागेल, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया हुतात्मा भूषण सतईच्या बहिणीने दिली. माझ्या भावाच्या बलिदानाचा बदला भारतीय सैन्यांनी घ्यावा, असेदेखील भूषण यांची बहीण सरिता यांनी सांगितलं. दरम्यान, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले मराठा रेजिमेंटचे जवान भूषण सतई यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
भूषणला वीरमरण येण्याच्या काही वेळापूर्वीच त्याने आईला फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगताना भूषणच्या आईला गहिवरून आले होते. तर भूषण वडिलांनी भूषणवर गर्व असल्याचे सांगितलं. तर भूषणचे काका यांनी त्यांच्या मुलाला भूषणसारखा हो म्हणून सांगितलं आहे. एकूणच संपूर्ण कोटोल शहरात शोककळा पसरली आहे. भूषणला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काटोलचे शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून आणि फुलांचा वर्षाव करून भूषणला श्रद्धांजली वाहिली.
भारताच्या ३ जवानांना वीरमरण -
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये हुतात्मा झाले. भारतानेदेखील प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा - हुतात्मा भूषण सतई यांना कामठी गार्ड रेजिमेंट येथे मानवंदना
हेही वाचा - नागपूरच्या हुतात्मा जवानावर 'या' कारणामुळे आज नाही, तर सोमवारी होणार अंत्यसंस्कार