नागपूर - आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा, अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा, हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे ,अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नितीन राऊत हे यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले -
- मी संपूर्ण राज्यातील माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. हे आशीर्वादचं आमचं पाठबळ आहे, हे आशीर्वादचं आमची शक्ती आहे.
- आम्ही राज्यकारभार आणि सरकार म्हणून ज्या काही आशा अपेक्षा जनतेच्या आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू.
- मंत्रालयामध्ये जेव्हा मी पत्रकार कक्षात गेलो होतो तेव्हा मी हीच भावना व्यक्त केली होती की, पत्रकार हा या समाजाचा महत्वाचा घटक आहे, आणि समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये आपण सहकार्य कराल ही एक अपेक्षा व्यक्त करतो.
- आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे, एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला याचा अभिमान बाळगत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाने चहापानावरच बहिष्कार टाकावा हे पक्षाच्या धोरणाला किती सुसंगत आहे याची मला कल्पना नाही.
- ज्यावेळी आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवत होतो, तेव्हा मी बोललो होतो की मला शेतकऱ्याला कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं नक्कीच टाकत आहोत.
- परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते
- सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही.
- मुंबईमध्ये कोणत्याही विकासकामांना किंबहुना राज्यातल्या कोणत्याही विकासकामाला आम्ही स्थगिती दिलेली नाही फक्त आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे.
- पहिल्यांदा नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पास केले आहे, हे घटनेला धरून आहे का? याचा फैसला न्यायालयात होऊ द्या आणि आम्ही जे प्रश्न विचारले होते, त्यामध्ये स्पष्टता आल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेऊ.