नागपूर - गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी नागपूरच्या पोलिसांनी २ अधिकाऱ्यांना अटक केल्याच्या घटनेने मेट्रो प्रशासनात खळबळ उडाली आहे. या संदर्भात आज महामेट्रोचे प्रसिद्धी प्रमुख अखिलेश हळवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मध्यंतरी महामेट्रोवर आरोपांची सरबत्ती करणाऱ्या राजकीय संघटनेला माहिती पुरवण्याचे कामदेखील या दोन अधिकाऱ्यांनी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
मागील काही महिन्यांपासून मेट्रोच्या कामकाजावर आणि एकंदरीत संपूर्ण आर्थिक व्यवहारात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप 'जय जवान जय किसान' या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार हे सातत्याने करत आहेत. त्यांना मिळणारी माहिती ही अत्यंत गोपनीय स्वरूपाची असल्याने महामेट्रोने हे सारेच प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले होते. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात एक तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. यासंदर्भात महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन देवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर माहिती आणि तंत्रज्ञान(आयटी) कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे.