नागपूर - महा-मेट्रोने विकसित केलेल्या मेट्रो निओ तंत्रज्ञानाचा वापर करून तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. या प्रोजेक्टमुळे काकटिया नगरविकास प्राधिकरणचे (कुडा) सुमारे २ हजार कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे. वारंगल, हणमकोंडा आणि काझीपेटसह त्याच्या आसपासच्या भागातील शहरांसाठी नियोजन प्राधिकरण आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रोला देण्यात आली आहे. मात्र आता राज्याबाहेरील प्रोजेक्ट सुद्धा महामेट्रोला मिळू लागले आहेत.
नाशिक मेट्रोच्या धर्तीवर वारंगल मेट्रो प्रकल्प -
कुडाने काही महिन्यांपूर्वी महा मेट्रोला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगितले होते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात टीमने वारंगल मेट्रोचा डीपीआर तयार केला आहे. हे काम महा-मेट्रोने अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण केले आहे. नागपूर आणि पुणे मेट्रोमध्ये काम केल्यामुळे महा मेट्रोला हा प्रकल्प मिळाला आहे. महा-मेट्रो आता महाराष्ट्रात तसेच बाहेरील प्रकल्प राबवित आहे. वारंगल मेट्रो निओची लांबी १५ कि.मी. आहे आणि सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून तयार केली जाईल. या प्रकल्पाची प्रति किमी किंमत ६० कोटी रुपये असण्याचा अनुमान लावण्यात आला आहे, त्याच तुलनेत पारंपरिक मेट्रोचा प्रत्येक किलोमीटर निर्माण करण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च येतो. वारंगल येथे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर नाशिक मेट्रोच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.
म्हणून वारंगल करीता मेट्रो- नियोचा पर्याय निवडवला -
वारंगल, हणमकोंडा आणि काझीपेट शहरांची एकूण लोकसंख्या २० लाख आहे. २० वर्षांनंतर म्हणजेच २०४१ मध्ये प्रत्येक दिशेने जाणारे ८ हजार प्रवासी अपेक्षित आहेत. अश्या परिस्थितीमध्ये पारंपरिक मेट्रोचा पर्याय उपयुक्त ठरला नसता म्हणून वारंगल करीता मेट्रो- नियोचा पर्याय निवडण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले आहे. कुडाने यापूर्वीच तेलंगणा सरकारला डीपीआर सादर केला आहे, लवकरच तो डीपीआर भारत सरकारकडे पाठविण्याची अपेक्षा आहे.
देशात सर्वात आधी नाशिक शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो नियो प्रकल्पाची संकल्पना ही नवीन असून देशात पहिल्यांदा या प्रकारचा प्रकल्प नियोजित करण्यात आले आहे. मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून मध्यम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. सर्व साधारण पणे २०- ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरां करिता नियो मेट्रो फार उपयुक्त ठरणार आहे. मेट्रो निओ तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रिक बसचा वापर केला जातो. रबर टायरच्या मदतीने ही मेट्रो-नियो धावणार आहे हे विशेष.
आधुनिक व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था -
ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) लाईन्सच्या मदतीने त्या संचालित केल्या जातील. वारंगल नियो मेट्रो ही एक प्रस्तावित मेट्रो प्रणाली आहे, ज्याचे काम वारंगल शहर ते १५ किलोमीटरपर्यंत, काझिपेट रेल्वे स्थानक ते वारंगल रेल्वे स्थानक व त्याच्या उपनगराद्वारे होईल. वाहतुकीची कोंडी कमी करण्याबरोबरच शहरातील एक आधुनिक व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
या उपाययोजना केल्याने होईल बचत -
महा-मेट्रोने विविध उपक्रमांच्या माध्यमातून वारंगल मेट्रोमध्ये किंमत अनुकूलन केले आहे. जेथे रस्त्याची रुंदी पुरेसे असेल तेथे मेट्रो ग्रेडमध्ये असेल. ग्रेडची (जमिनीवर) लांबी ७ किलोमीटर असेल तर एलिव्हेटेड मार्ग हा ८ किलोमीटर लांबीचा असणार आहेत. स्वयंचलित तिकीट सिस्टमची व्यवस्था केली जाईल. प्लॅटफॉर्मचा केवळ एक तृतीयांश भाग शेडने व्यापला जाईल, ज्यामुळे बांधकाम आणि प्रकाशयोजना खर्च वाचतील. वीज वाचविण्यासाठी स्टेशनवर वर सौर पॅनल्स बसविण्यात येतील आणि त्यामुळे कार्यरत खर्च कमी होईल. पारंपरिक मट्रोला संचालित करण्यासाठी प्रति किमी ३५ मनुष्यबळाची आवश्यकता असते मात्र नियो मेट्रो करिता प्रति किलोमीटर १५ लोकांची गरज असेल अश्याच प्रकारच्या काही उपाययोजना करून वारंगल नियो मेट्रोच्या दोन हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
हेही वाचा - नागपूर महामेट्रोचा रविवार स्पेशल.. प्रवाश्यांसाठी खाणे-गाण्यासह, शॉपिंगची मेजवानी