नागपूर Congress Ramesh Chennithala : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पीसीसी एक्झिक्यूटिव्ह कमिटीनं महाराष्ट्रातील एकूण 6 विभागामध्ये येत्या काळात काँग्रेसच्या बैठकांचं आयोजन केलंय. त्यापैकी पहिली बैठक ही आज अमरावतीत होणार आहे. काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे नेता आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलीय. आज ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात : "लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या काळात कोणाला किती जागा दिल्या जातील यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार आम्ही निवडणुकांना पुढं जाऊ. जागा वाटपाच्या संदर्भात बऱ्यापैकी सहमती झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांत लवकरात लवकर अंतिम यादी जाहीर करू" अशी माहिती काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलीय.
गडचिरोलीत होईल बैठक : रमेश चेन्निथला म्हणाले," काँग्रेस पहिल्यांदाच आदिवासी बहुल भागातील गडचिरोलीमध्ये जाऊन बैठक घेणार आहे. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत. नागपूर विभागाची बैठक गडचिरोलीमध्ये होणार आहे. आम्ही सत्तेसाठी लढत नाही तर एक आदर्श आणि विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. पण, काही लोक पद नसले की निघून जातात. जाणाऱ्यांमुळे काँग्रेस पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम आहे."
राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळं सुरू : "हिंदू धर्माचं पावन वास्तव सांगणारे 4 शंकराचार्य जर त्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी जाणारच नसतील, तर तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारता? ते म्हणतात कार्यक्रमाचं राजकीयीकरण झालेलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असेल तर हे काय राजकारण नाही का? रामांना आम्ही मानतो. त्यामुळं हजारोंच्या संख्येनं आम्ही जाऊ. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळं सुरू आहे. त्याला आम्ही सहमत नाही. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इव्हेंट मॅनेजमेंटच काम सुरू आहे. चार शंकराचार्यांनी मनाई केल्यावर यापेक्षा आणखी काय प्रमाण पाहिजे", असं म्हणत त्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन भाजपावर टीका केलीय.
ज्यांना जायचं आहे त्यांनी लवकर जावं : "काँग्रेसला सोडून कोणीचं जाणार नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी लवकर जावं. पार्टीच्या आदर्शांवर जे काम करतात ते कोणी जाणार नाही. सरकारकडून सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग होत आहे. भाजपा नेता किंवा कार्यकर्त्यावर कधी ईडीचा छापा पडला का? भाजपामधील कोणाला अटक झाली का? कारण भाजपा विरोधकांवर ईडी आणि सीबीआय लाऊन काम करतंय", असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :