नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांचे ३४ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, तर रामटेक येथून २२ उमेदवारांनी २९ अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. २८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला होणार असल्याने मतदानासंदर्भात प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. सोमवारी नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवार प्रचाराच्या कामात व्यस्त झाले आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांनी एकूण ३४ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे बंडखोर माजी खासदार तसेच काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांच्यामध्ये खरी लढत असणार आहे. विदर्भ निर्माण महासंघ म्हणजे अॅडव्होकेट सुरेश माने आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डब्रसे यांच्यातही चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यात सामना होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया २८ तारखेला पूर्ण केली जाणार आहे. तोपर्यंत अनेक उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार आहेत? हे चित्र स्पष्ट होईल.