नागपूर - वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे नागपुरात सात दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा पाचवा दिवस आहे. तरीदेखील रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल(शुक्रवारी) दिवसभरात 3 हजार 300 कोरोनाबाधित सापडले. यामुळे रुग्णांची दैनंदिन सरासरी 1 हजार झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला आणखी कठोर पावले उचालण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आज आढावा बैठक घेणार आहेत. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उपराजधानीत कोरोनाचा कहर -
गेल्या आठवड्यापासून नागपुरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 35 जणांचा मृत्यू झाला. ही संख्या मागील वर्षी कोरोना प्रकोपाच्या काळापेक्षाही जास्त आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर नियम आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक -
नागपुरात 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आज लॉकडाऊनचा पाचवा दिवस आहे. येत्या आठवड्यातील होळी सणाचा विचार करता नागरिक एकत्र येऊन आणखी कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात पालकमंत्री विभागीय आयुक्त कार्यलयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद