नागपूर - कोरोनाचा मानवी जीवनावर कसा आणि कोणता परिणाम होईल हे सांगता येत नाही. डोळ्याने न दिसणारा हा विषाणू देशाच्या लोकसंख्यावाढीवरही परिणाम करू शकतो, असा एक अभ्यास समोर आला आहे. महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये काम करणाऱ्या "फाऊंडेशन फॉर रिप्रोडक्टीव्ह हेल्थ सर्व्हिसेस" या संस्थेने हा अभ्यास केला आहे. त्यामध्ये लॉकडाऊनमुळे येणाऱ्या काही महिन्यात देशाची लोकसंख्या लाखोंनी वाढू शकते असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. शिवाय असुरक्षित गर्भपात आणि त्यामुळे मातामृत्यू दरही वाढू शकेल अशी भीतीही व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागात कुटुंब नियोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची कमतरता झाली आहे. यामुळे देशात कोट्यवधी जोडप्यांपर्यंत कुटुंब नियोजनाची साधने पोहोचू शकलेली नाहीत. त्यामुळे लाखो महिलांना ईच्छा नसताना लॉकडाऊनमध्ये गर्भधारणा स्वीकारावी लागल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाशी जोडलेल्या तज्ज्ञांनीही अभ्यासातील निष्कर्षांना दुजोरा दिला आहे. लोकसंख्यावाढीचे हे विपरीत परिणाम टाळायचे असल्यास भविष्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम जोमाने राबवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाने जगात सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना हा सूक्ष्म विषाणू भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात आणखी एक अनावश्यक परिणाम घडवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जगातील ३७ विकसनशील देशातील महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी काम करणाऱ्या "फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टीव्ह हेल्थ सर्व्हिसेस" या संस्थेने एक अभ्यास केला आहे. यामध्ये, "भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर कोरोनाचा परिणाम" असे या अभ्यासाचे शीर्षक आहे. त्यामध्ये धक्कादायक हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे जशी इतर अत्यावश्यक साधनांची कमतरता झाली. तशीच कमतरता कुटुंब नियोजन कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवण्यासाठी आवश्यक साधनांबद्दलही झाली आहे.
त्यामुळे देशाचा कुटुंब नियोजन कार्यक्रम यावर्षी त्यांच्या नियोजित लक्ष्यपेक्षा २० टक्के मागे राहू शकेल, असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे पुढील काही महिन्यात देशात २३ लाख ते २९ लाख महिलांना इच्छा नसतानाही गर्भधारणा स्वीकारावी लागू शकते. यापैकी मोठ्या संख्येने महिला गर्भपाताचा मार्ग स्वीकारू शकतात. त्यामुळे त्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न तर निर्माण होईलच. शिवाय लॉकडाऊन काळातल्या अनैच्छिक गर्भधारणेमुळे लाखोंच्या संख्येने बाळ जन्माला येऊ शकतात, असे भाकीतही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
त्यानुसार -
०१) लॉकडाऊनमुळे कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता होऊ शकणार आहे.
०२) गर्भ निरोधकाची उपलब्धता ५० कोटीने कमी होऊ शकेल
०३) गर्भ निरोधक गोळ्यांची उपलब्धता १२ लाख ८० हजाराने कमी होऊ शकेल. तर, आयपीएल सारख्या इमरजेंसी कॉन्ट्रासेप्टीव्ह्सची विक्री ही १० लाखाने कमी होणे शक्य आहे
०४) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही ८ लाख ७० हजाराने कमी होऊ शकतात
०५) कॉपर टी बसवण्याची प्रक्रिया ही १२ लाखाने कमी होऊ शकते, असे भाकीत या अभ्यासात व्यक्त केले आहे.