नागपूर - विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा जीवनव्रती पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना घोषित झाला होता. तो त्यांना आज सायंकाळच्या समारंभात प्रदान केला जाणार होता. मात्र व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आल्याने नाराज झाल्याने डॉ. यशवंत मनोहर यांनी पुरस्कार स्वीकार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यामुळे विदर्भाच्या संस्कृती क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
गेल्याच महिन्यात यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा जीवनव्रती पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी, त्यांनी पुरस्कार वितरणाच्या समारंभाच्या व्यासपीठावर सरस्वतीची मूर्ती ठेऊ नका, ही मागणी त्यांनी आयोजकांकडे केली होती. मात्र, आज जेव्हा कार्यक्रमाच्या पूर्वी त्यांनी या संदर्भात चौकशी केली तेव्हा सरस्वतीची मूर्ती व्यासपीठावर ठेवण्यात आली असल्याचे कळताच त्यांनी पुरस्कार स्वीकार करण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय
डॉ. यशवंत मनोहर यांनी लिहिलेले पत्र
'डॉ. ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली. पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकांची प्रतीके मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान ! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजावून घ्यावं. मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. ते मला निश्चित समजावून घेतील ही खात्री मला आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कारण मी मला नाकारलं तर माझ्याशी जगण्यासारखं काहीही नाही.
क्षमस्व! -- यशवंत मनोहर '
साहित्य वर्तुळातील प्रतिक्रिया
यशवंत मनोहर यांच्या पुरस्कार नाकारण्याच्या कृतीनंतर 'प्रसंग कटूच.. पण प्रश्न तत्त्वांचाही आहेच' , 'सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत' अशा प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून उमटल्या आहेत.
'आज सायंकाळी मनोहर सरांनी तो पुरस्कार नाकारल्याचे समजले आणि धक्का बसला. पण त्यांनी साहित्य संघाला जे कळवले ते इतके तार्किक आणि विवेकवादी भूमिकेला धरून आहे त्यांची भूमिका योग्य वाटते. जी तत्त्वे उराशी घेऊन त्यांनी आयुष्यभर साहित्यक्षेत्रात संघर्ष केला, त्या तत्त्वांशी प्रतारणा कशी करायची असा त्यांना पडलेला प्रश्न योग्यच वाटतो. आम्झी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. साहित्य संस्था ही सार्वजनिक जागा असते, तिथे एका धर्माची प्रतीके असू नयेत ही भूमिका कुणाही लोकशाही व विवेकनिष्ठा मानणाऱ्या व्यक्तीला पटणारी अशीच आहे,' अशी प्रतिक्रिया नागपूरच्या अरुणा सबाने यांनी दिली आहे.
हेही वाचा - अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या मदतीला मनसेसह भाजपचे नेते