नागपूर - हिंगण्याच्या सुरज नगर परिसरात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भलामोठा कासव दिसून आला. या कासवाचे वजन तब्बल 22 किलो आहे. हा 'लेथ सॉफ्टशेल टर्टल' या प्रजातीचा कासव आहे. तो प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळतो. मात्र, आता तो हिंगणा शहरात कसा पोहोचला? हे अद्याप कळू शकले नाही. अचानक रस्त्यावर आढळलेल्या या कासवामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिंगणा परिसरात हा मोठा कासव सुरज नगर कॉलनीच्या रस्त्यावर चालताना एका व्यक्तीला दिसला. याची माहिती त्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना दिली. निनावे आपल्या पथकासोबत त्यास्थळी पोहोचले. त्यांनी कासवाला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले.
भीमकाय कासवाचे वजन २२ किलो २०० ग्रॅम
या कासवाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात तो कासव पाण्यात राहणारा असून त्याचे नाव Leith's Softshell Turtle असल्याचे समोर आले. दरम्यान, हा कासव विदर्भात दुर्मिळ आहे. तो प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. विशेष म्हणजे या भीमकाय कासवाचे वजन २२ किलो २०० ग्रॅम आहे. त्याची लांबी ८३ सें.मी. व रुंदी ५१ सें.मी. आहे. त्याच्या शरीराचा संपूर्ण घेर १६५ सेंमी इतका आहे.
यात ट्रान्झिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशुपर्यवेक्षक सिद्धांत मोरे यांनी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. कासवाची स्थिती उत्तम आहे. वैदकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा - Corona : पाळीव प्राणी असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी