नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात ली या वाघिणीने एका पिल्लाला जन्म दिला. मात्र, जन्म दिल्यानंतर पिल्लाला उचलताना तिचा दात लागून पिल्लाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान ली या वाघिणीने यापूर्वीदेखील असाच बछड्याचा जीव घेतला होता.
एकाच पिल्लाला दिला जन्म - ली या वाघिणीने ३१ मे २०२२ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका पिल्लाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर या पिल्लाला उचलताना लीचा दात लागून पिल्लाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यावेळी प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापिठातील तज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशीरा तिच्या प्रसव पिडा थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत, किंवा असल्यास त्याबाबत पुढील उपचार या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
ली आणि राजकुमारला झाला होता बछडा - ली आणि राजकुमार या गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील वाघाच्या जोडीला पिल्ले होण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. लीचे वय जास्त असल्याने सदर प्रयत्नाना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी होत्या. लीचे वय साधारण ११ वर्षे आहे (वाघाचे नैसर्गिक आयुष्य १०-१२ वर्षे असते.) गेले महिनाभर ली वाघिणीला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या नैसर्गिक पद्धतीने प्रसव होण्यासाठी तिच्या रात्र निवाऱ्यात विशेष बाळंतगुफा तयार करण्यात आली आहे. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थेव्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय कुलरची सोय देण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तुणुकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
यापूर्वी सुद्धा तिने घेतला पिल्लांचा जीव - यापूर्वी ली २०१६ साली साहेबराव नावाच्या वाघापासून एकदा गर्भार राहीली होती. त्यावेळी तिने चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यावेळेस तिला मातृत्व भावना नसल्याने काही वेळातच तिने सर्व पिल्लांना मारुन टाकले होते. आईपासून लहाणपणीच विभक्त झालेल्या बहुतेक मांसाहारी प्राण्यांमध्ये अशी लक्षणे पहिल्या बाळंतपणात दिसून येतात. यावेळेस तिने पिल्लांना न स्विकारल्यास पिल्लांच्या संगोपनासाठी विशेष इनक्युबेटरची व्यवस्था प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आली होती.