नागपूर : गृहमंत्री अमित शाह किती खोटे बोलतात, चुकीची माहिती देतात हे या देशाने पाहिले आहे. कलावती यांच्या विधानावरून आपल्याला समजले आहे. राहुल गांधींचे समाजकार्य देशातील जनतेला माहिती आहे. राहुल गांधी यांनी कलावतीच नव्हे तर निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सत्याने नव्हे तर खोटे बोलून देश चालवला जातो, हे गृहमंत्र्यांच्या भाषणातून देशाला कळले आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शाह यांच्यावर केला आहे.
आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसने राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी नागपूर, रामटेक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विजय वडेट्टीवार यांना मतदारसंघाची स्थिती, भाजपाची अवस्था, तसेच पक्षांतर्गत वाद, गटबाजी अशा आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेसची नेमकी स्थिती काय : लोकसभेच्या जागा वाटपासाठी ही केवळ आढावा बैठक आहे. कोणत्या मतदारसंघात राजकीय स्थिती काय आहे? कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे, आमचे बूथ बनले की नाही, आमची स्थिती काय आहे, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची स्थिती काय आहे, काँग्रेससाठी किती अनुकूल वातावरण आहे याचा आढावा घेत आहोत. आम्ही तळागाळातील पदाधिकाऱ्यांना माहिती गोळा करायला सांगत आहोत, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जागावाटपानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेत कोणाचे वर्चस्व आहे, हे सांगता येणार असून त्यादृष्टीने आम्ही आढावा बैठक घेत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
बच्चू कडू यांना पश्चाताप होत असेल : आमदार बच्चू कडू यांना आता त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत असेल. त्यांनी सत्याचा त्याग करून असत्याचा मार्ग स्वीकारला. असत्याच्या मार्गावर बच्चू कडू चालत नाही. कारण बच्चू कडू हे सत्याच्या मार्गावर चालणारे व्यक्तिमत्व असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा -
- Sunil Tatkare On CM : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यात कोल्ड वॉर? सुनील तटकरेंनी दिले 'हे' स्पष्टीकरण
- Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
- Nawab Malik Bail Granted : अखेर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; 'हे' दिले कारण