नांदेड - भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजात जो अपप्रचार पसरविण्यात येत आहे, त्यास सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. शहरातील शंकरराव चव्हाण मेमोरीयल येथे आज काँग्रेस सोशल मीडियाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला.
अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे
अशोक चव्हाण म्हणाले की, वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत पोहचवून विश्वासाहर्ता निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपसह विरोधकांच्या अपप्रचाराला अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. या समवेतच समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. या गोष्टीही समाजात पोहोचविल्या पाहिजेत. जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाच्या पदाधिकार्यांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
तालुका निहाय सोशल मीडिया पदाधिकार्यांची नियुक्ती करावी
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले की, विधानसभा निहाय पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच तालुका निहाय काँग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी. सोशल मीडियातील पदाधिकार्यांना लोकांपर्यंत योग्य व खरी माहिती पोहचविण्यासाठी त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाची टीम सक्षम झाल्यास निश्चितच काँग्रेस पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैचारिक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडली गेली पाहिजे
या प्रसंगी माजी मंत्री डी.पी. सावंत म्हणाले की, सोशल मीडिया हे परसेप्शन बनविण्यासाठी महत्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर लोकांचा विश्वास असल्याने विश्वासपूर्ण व खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. काँग्रेस सोशल मीडियाचे पदाधिकारी काँग्रेसच्या विचाराने जोडल्या गेले असल्याने वैचारिक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडली गेली पाहिजे. नेहरू, गांधी व काँग्रेस विचारधारेच्या पुस्तकांचे पदाधिकार्यांनी वाचन करावे, ज्यामुळे काँग्रेसची विचारधारा मांडणे सोपे होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा - नांदेड विभागातील २४ कारखान्यात ५१ लाख टन ऊसाचे गाळप
संतोष पांडागळे यांनी प्रास्ताविक केले, तर उपस्थितांचे आभार गोविंद शिंदे नागेलीकर यांनी मानले. व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, काँग्रेस सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजीत हाळदेकर, श्रीनिवास शिंदे, राजू बारसे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार मोहन हंबर्डे यांची नियुक्ती