नागपूर - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीत आता काही अंशी शिथिलता मिळाली आहे. यातच, गेल्या तीन महिन्यांपासून नाईलाजास्तव बंद झालेले उद्योग आता पुन्हा स्टार्ट घेण्यासाठी धडपडत आहेत. नागपूर जिल्ह्यापुरता विचार केला तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातील ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. त्या उद्योगांमध्ये काम करणारे ४३ हजार कामगार हे कामावर रुजूदेखील झाले आहेत.
टाळेबंदीत बहुसंख्य कामगारवर्ग आपल्या मायदेशी परत गेल्यानंतर हे उद्योग धंदे सुरू करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बऱ्यापैकी कामगार स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ लागल्याने आता उद्योगांचे इंजिन जेमतेम सुरू झाले आहे. येत्या काळात हे आकडे वाढणार असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामगारांची आर्थिक कोंडीदेखील सुटणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील काही तालुका स्तरावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहेत. टाळेबंदीचा फटका बसल्याने या उद्योग क्षेत्रातील सर्वच लहान मोठ्या कंपन्या बंद झाल्याने भविष्याचा वेध घेत कामगार वर्ग आपल्या जन्मभूमीत परतले. मात्र, आता टाळेबंदीत शिथिलता मिळायला सुरुवात होताच नागपुरातील हे सर्व उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. शिवाय गावी परत गेलेला कामगार वर्गदेखील हळूहळू परत यायला सुरुवात झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी पंचतारांकित एमआयडीसी, हिंगणा एमआयडीसीसह विदर्भाला उभारी देण्याची क्षमता असलेल्या मिहानचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात यात अत्यावश्यक सेवेतील उद्योगांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत २७०० युनिटने काम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी २ हजार १८० युनिटने उत्पादन देखील सुरू केलं आहे. लॉकडाऊनच्या काळातील २९० युनिट अत्यावश्यक सेवेत मोडतात ते सुरू झाले होते. आता हा आकडा २ हजार ८०० युनिटपर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे ४३ हजार कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.