नागपूर - जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याला मागणी मोठी असली तरी ऐन हंगामात संत्र्याची आवक मात्र अर्ध्यावर आली आहे. अवकाळी पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच संत्र्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आणि व्यापारी चिंतेत आहेत.
नागपुरी संत्रा आपल्या रसाळ गोडव्यासाठी जगप्रसिद्ध आहे. देशात आणि देशाबाहेर देखील नागपूरच्या संत्र्यांना प्रचंड मागणी आहे. सध्या संत्रा बाजारात हवा त्या प्रमाणात संत्री येत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आंबिया बहराचा संत्रा तोडणीवर आला असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात संत्र्याचे नुकसान झाले. त्यामुळेच त्याचा यंदाच्या संत्रा उत्पादनावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा - मिहानमध्ये वाघाचा वावर, नामांकित कंपन्यांच्या कर्माचऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या काळात दरवर्षी नागपूरच्या संत्रा बाजारात संत्र्याची मोठी आवक होते. मात्र, सध्याची परिस्थिती बघितली तर आवक बाजारात अर्ध्यावर आली आहे. संत्र्याची अवाक घटल्याने व्यापारी सुद्धा हतबल झाले आहेत. आधीच पाऊस उशिरा आला, त्यातही ज्या संत्री झाडाला लागल्या त्याही अवकाळी पावसाने गाळून पडल्या. त्यामुळे झाडाला असलेला संत्रा आता अर्ध्यापेक्षा कमी झाला असून खराब व्हायला लागला आहे. या काळात बाजारात संत्र्याला 50 रुपये भाव मिळायला पाहिजे होते. मात्र, संत्र्याची परिस्थीती पाहता आता तो भाव 30 रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा - जगातील कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी