नागपूर - महानगरपालिकेच्या १० झोनच्या सभापती पदांसाठी आज निवडणूक पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या १० पैकी ९ झोनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली. तर, मंगळवारी झोनमध्ये ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने या झोनमध्येही भाजपच्या उमेदवाराचा अविरोध विजय झाला. एकूण १० पैकी ९ झोन सभापतींची अविरोध निवड झाला. आसीनगर झोनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने बाजी मारली.
हेही वाचा - पुढील तीन दिवस विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दहाही झोन सभापतींच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या.
लक्ष्मीनगर झोनच्या सभापती म्हणून प्रभाग ३६ च्या नगरसेविका पल्लवी अशोक श्यामकुळे, धरमपेठ झोन सभापतीपदी प्रभाग १५ चे नगरसेवक सुनील दुलिचंद हिरणवार, हनुमाननगर झोन सभापतीपदी प्रभाग ३२ च्या नगरसेविका कल्पना राम कुंभलकर, धंतोली झोन सभापती म्हणून प्रभाग ३३ च्या नगरसेविका वंदना भानुदास भगत, नेहरूनगर झोन सभापतीपदी प्रभाग ३० च्या नगरसेविका स्नेहल सतीश बिहारे, गांधीबाग झोन सभापतीपदी प्रभाग २२ च्या नगरसेविका श्रद्धा विजय पाठक, सतरंजीपुरा झोन सभापतीपदी प्रभाग ५ च्या नगरसेविका अभिरुची अनिल राजगिरे, लकडगंज झोन सभापती म्हणून प्रभाग ४ च्या नगरसेविका मनीषा चक्रधर अतकरे या सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली.
मंगळवारी झोन सभापतीपदासाठी भाजपकडून प्रभाग १ च्या नगरसेविका प्रमिला प्रीतम मथरानी व काँग्रेसकडून प्रभाग १० च्या नगरसेविका साक्षी विपीन राऊत यांनी उमेदवारी दाखल केली होती. पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साक्षी राऊत यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, या झोनच्या सभापती म्हणून भाजपच्या प्रमिला प्रीतम मथरानी अविरोध निवडूण आल्या. एकूणच नऊ झोनच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली.
मोहम्मद जमाल यांच्यासह काँग्रेस तटस्थ
आसीनगर झोनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या झोनच्या सभापती पदासाठी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केले होते. यामध्ये भाजपकडून प्रभाग ३ च्या नगरसेविका भाग्यश्री गणेश कानतोडे, बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ६ च्या नगरसेविका वंदना राजू चांदेकर व प्रभाग ७ चे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला होता. पीठासीन अधिकाऱ्यांनी तिनही अर्ज वैध असल्याचे नमूद करून अर्ज मागे घेण्यासाठी निर्धारित वेळ उमेदवारांना दिला. या वेळेमध्ये अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, भाजपच्या भाग्यश्री कानतोडे व बसपच्या वंदना चांदेकर यांच्यात थेट लढत झाली. ज्यामध्ये भाजपच्या भाग्यश्री कानतोडे यांना तीन मते मिळाली, तर बसपच्या वंदना चांदेकर यांना एकूण ६ मते प्राप्त झाली.
बसपच्या वंदना राजू चांदेकर यांचा ३ मतांनी विजय झाल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घोषित केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत अर्ज मागे घेतलेले अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. तर, काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, नगरसेविका भावना लोणारे अनुपस्थित होत्या.
हेही वाचा - राज्य सरकार वीजग्राहकांमध्ये दहशत निर्माण करत आहे - विदर्भ राज्य आघाडी