नागपूर- शिवसेना प्रणित युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी युतीच्या जागा वाटपा संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. हा मुद्दा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाराचा असल्याने मी यावर भाष्य करणार नसल्याचे आदित्य यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे 'जनआशिर्वाद' यात्रा निमित्त शहरात आले होते. यावेळी त्यानी सदरील प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, राज्यात परत युतीचे सरकार आल्यास तुम्ही उपमुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न आदित्या ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना, या विषयाचा पेपर मी फोडणार नाही, मात्र पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याने त्या दूर झाल्या पाहिजे. या करिता आम्ही प्रयत्न करत आहे. मात्र, सरकार त्या त्रूटी दूर करत नसतील तर आम्ही आंदोलन करायला सुद्धा कमी पडणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेतील युती ही मुद्यांवर आधारित आहे. ज्यामध्ये कृषी विकास, राज्याचा सर्वांगीण विकास, हिंदुत्व या सारख्या विषयांचा समावेश आहे. ही युती सत्तेसाठी नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ईडी संदर्भात प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला.