नागपूर - पेंच अभयारण्यातील वाघिणीने शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंगावर काटा उभा राहणारा हा प्रसंग एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. जंगलात भ्रमंती करताना या वाघिणीने सांबरच्या बछड्याची शिकार केली आहे. यातून वाघाला जंगलाचा राजा का संबोधले जाते याची प्रचिती येते.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक : अपहरण करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले; चौघांविरुद्ध गुन्हा
वाघिणीने जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे. सुमारे तीन दिवसापूर्वी चोरबाहुली गेटजवळ एका पर्यटकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. वायू वेगाने आलेल्या वाघिणीने सांबराच्या बछड्याची शिकार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
घाटमारा नावाच्या वाघिणीने साधला अचूक निशाणा
घाटमारा नावाच्या वाघिणीने ही शिकार केली आहे. घाटमारा वाघीण जंगलात फिरत असताना तिला शिकार दिसली. थोड्यावेळ आपले जणू काही लक्ष नसल्याचे दाखवत घाटमारा वाघिणीने अगदी विद्युत वेगाने आपल्या शिकारीवर झडप टाकली. शिकार केल्यानंतर ते घेवून लगेच ती तेथून निघून गेली. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात चित्रित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर नजिकच्या पेंच जंगलात व्याघ्रदर्शन हमखास होत असल्याने पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हेही वाचा - नागपूरात 28 किलो गांजासह दोघांना अटक; झारखंडहून गांजा तस्करी