नागपूर - राज्य सरकार एका बाजूला लस खरेदी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने अनेक दिवसांपूर्वी मागितलेली परवानगी देत नाही. सर्वात आधी नागपूर महानगरपालिकेने परवानगी मागितल्यानंतर परवानगी देता येणार नाही असे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. मग दुसर्या बाजूला मुंबई महापालिकेला एक कोटी लस खरेदी करण्याची परवानगी कोणत्या आधारे देण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने खुलासा करावा तसेच राज्य सरकार नागपूरसोबत दुजाभाव का करत आहे असा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर कसे -
उपराजधानी नागपूर येथील लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी. या उद्देशाने काही दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लस खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी एक पत्र लिहिले होते. लस कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना परस्पर खरेदी करता येणार नसल्याचं उत्तर मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढल्याने यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी नागपूरला परवानगी द्यावी -
कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील प्रत्येकाचे नागरिकांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने लस खरेदी करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. यामागचा उद्देश म्हणजे लसीकरणाचा राज्य सरकार असलेला भार कमी करणे हा देखील होता. याविषयी राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी नागपूरला परवानगी द्यावी अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.
काँग्रेस नेत्यांनी वजन वापरावे -
कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्याला लाटेपेक्षा तीव्र असेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची मोहीम आणखी गतिशील व्हावी याकरीता नागपुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपले वजन वापरून नागपुर महानगरपालिकेला लस खरेदी करण्याची परवानगी मिळवून द्यावी असेदेखील आवाहन प्रवीण दटके यांनी केले.
हेही वाचा - वाघिणीच्या 'त्या' बछड्यांचा मृत्यू वन विभागाला जागे करणारी घटना - कल्याण कुमार