नागपूर - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ( Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Samriddhi Highway ) नागपूर ते शिर्डी 530 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. या महामार्गामुळे विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान असल्याचे शिंदे म्हणाले. ज्यावेळी या प्रकल्पाची सुरुवात झाली त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. तर, मी या विभागाचा मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाने आकार घेतलेला आहे. आज हा महामार्ग सुरू होत असताना देखील आम्हाला लोकार्पण बघायचं भाग्य मिळालं आहे असं ते म्हणाले. निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्र्याचं नाव नसल्याच्या विषयावर मुख्यमंत्री म्हणाले की प्रोटोकॉल नुसार पत्रिका तयार करण्यात आली आहे.
सीमाप्रश्न सोडवला जाईल - आधी सीमा प्रश्न सोडवावा त्यानंतरच समृद्धीचे उद्घाटन करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सीमा प्रश्न देखील सुटेल. सीमा भागात ज्या योजना बंद करण्यात आल्या होत्या त्या पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सीमा प्रश्नसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्र्यांना सीमा प्रश्नाची जाणीव असल्याचं त्यांनी सांगितलं.
सीमा प्रश्नावर कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नावर ट्विट करत आम्ही मागे हटणार नाही असं म्हटलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की सीमा प्रश्न हा न्यायप्रविष्ठ आहे,त्यामुळे यावर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये.