नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर आज सांयकाळी मेघ-गर्जनेसह हजेरी लावली. शहरात अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जुलै महिन्यात देखील नागपूरकरांना प्रचंड उकाडा सहन कराव लागला. तसेच थोडाफार पाऊस येताच शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या. मात्र, पावसाअभावी पिके करपायला लागली होती. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत होता. अखेर आज सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, आता दमदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यातील पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.