नागपूर - जिल्ह्यात असलेल्या काटोलमध्ये राजकीय भूकंप आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात असलेल्या काटोल नगर परिषदेतील वीस नगरसेवकांना पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तीन प्रकरणांमध्ये अनियमितता आढळल्याने नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या कारवाईची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने काटोल नगरपरिषद बरखास्त करण्याचा आदेश काढला आहे. यामध्ये नगराध्यक्षांसह पालिका उपाध्यक्ष आणि गटनेत्यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाई विरोधात अपात्र सदस्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
यांच्यावर झाली कारवाई -
अपात्र ठरवण्यात आलेल्यांमध्ये नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह सुभाष काेठे, माया शेरकर, मीरा उमप, श्वेता डाेंगरे, किशाेर गाढवे, शालिनी बन्साेड, राजू चरडे, लता कडू, संगीता हरजाल, सुकुमार घाेडे, वनिता रेवतकर, देवीदास कठाणे, शालिनी महाजन, प्रसन्न श्रीपतवार, जयश्री भुरसे, मनाेज पेंदाम हे निर्वाचित नगरसेवक आणि हेमराज रेवतकर व तानाजी थाेटे या नामनिर्देशित नगरसेवकांचा समावेश आहे.
का झाली कारवाई?
काटोल नगर परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनेक विकास कामांच्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. यामध्ये कामाच्या निविदा नियमबाह्यपणे काढण्यात आल्याचा ठपका सत्ताधाऱ्यांवर ठेवण्यता आला होता. तीन प्रकरणांची तक्रार राज्य सरकारकडे गेल्याने या प्रकरणांची चौकशी सुरू झाली होती. ज्या योजनांमध्ये अनिमियतता आढळली आहे. यामध्ये शहरातील गुंठेवारीबाबतची तक्रार, खेळाचे आरक्षित मैदान व शासकीय जाागेवर नियमबाह्य बांधकाम केल्याची तक्रार, घरकुलांचे निकृष्ट बांधकामाबाबत तक्रारींचा समावेश आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बाजारपेठेतील ओटे परस्पर तोडण्यात आल्याची तक्रार सुद्धा यामध्ये नमुद आहे. या प्रकरणावर ११ नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांच्यासह इतर २० सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्यपाल कार्यालयातर्फे बरखास्तीच्या या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
काटोल नगर परिषदेतील राजकीय स्थिती -
काटोल नगर परिषदेत विदर्भ माझा पक्ष आणि भाजपा पक्षात युती आहे. विदर्भ माझा पक्षाची एकूण सदस्य संख्या २३ आहे. यामध्ये १८ सदस्य हे विदर्भ माझा पक्षाचे आहेत तर एक सदस्य हा भाजपाचा आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विदर्भ माझा पक्षाने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली होती तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली होती.