नागपूर - जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. तरी देखील देशात सर्वाधिक कोरोना विषाणुची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामुळे आता शाळा, महाविद्यालयात खासगी शिकवणी वर्ग आणि ग्रंथालय बंद करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे अनेकांची गैरसोय होत असली तरी हा निर्णय आपल्या सुरक्षेसाठीच असल्याची जाणीव देखील नागरिकांना आहे.
नागपूर येथील शासकीय ग्रंथालयात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा आयोगा सोबतच विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कुठे करायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी नागपूरला खोली करून राहतात. पुढील काही दिवस ग्रंथालयात अभ्यास करता येणार नाही याची कल्पना या विद्यार्थ्यांना आहे, तरी देखील या विद्यार्थिनींनी सरकारने केलेल्या उपाय-योजनांना पाठिंबा दर्शवला आहे. त्याच्या सोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत करून त्यांचे मत जाणून घेतले आहे.