नागपूर - शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगरात एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. सचिन अलोने असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पैशाच्या वादावरून आकाश भोंगे नावाच्या तरुणाने सचिनचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकाश भोंगेसह राहुल जाधव नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
नागपूरच्या गिट्टी खदान परिसरातील पंचशील नगरात सचिन अलोनेच्या खुनाचा थरार घडला आहे. आरोपी आकाशचा मामा रतन आणि सचिन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैश्याचा वाद सुरू होता. बुधवारी त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर रतन यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आपल्या मामाच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर संतापाच्या भरात आकाशने मित्राच्या मदतीने सचिन अलोनेवर धारधार शस्त्रांनी वार केले. हल्ल्यांनतर सचिनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळातच गिट्टीखदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.