नागपूर - कोरोनाचा धोका वाढल्यापासून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एका माणसाने दुसऱ्यापासून अंतर राखायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात एका माकडाच्या पिल्लाची आणि हरणाच्या पाडसाची मैत्री चांगलीच बहरली आहे. या अनोख्या मैत्रीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
नागपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात काही दिवसांपूर्वी माकडाचे लहान पिल्लू जखमी अवस्थेत आणण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात हिंगणा परिसरात लोकांनी केलेल्या दगडफेकीत ते पिल्लू आणि त्याची आई जखमी झाले होते. त्यानंतर दोघांवर उपचार केल्यानंतर आईला वन विभागाने वनात सोडले. मात्र, हे माकडाचे पिल्लू उपचार केंद्रामध्येच राहिले. त्यामुळे ते माकडाचे पिल्लू आईपासून दुरावलेले आहे, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात हरणाचे एक पाडस सापडले. आईपासून दुरावल्यामुळे त्याला वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. त्यामुळे माकडाच्या आणि हरणाच्या दोन्ही पिल्लांना एकमेकांची साथ मिळाली आहे. दोघे एकमेकांसोबत खेळत-खेळत मोठे होत आहे. या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कौतुक वाटते.
दोघेही सध्या दुधावरच आहेत. त्यामुळे हरणाच्या पाडसाला दूध पाजताना माकडाचे पिल्लाला लगेच राग येतो. हे पिल्लू त्या कर्मचाऱ्याला मारतो, ओरबाडतो. घरात दोन भावंडे एखाद्या वस्तूसाठी भांडतात तसेच हे दोघेही भांडताना दिसतात. दोघेही आईविना वाढत आहेत. सर्वांना यांचा लळा लागला आहे. या दोघांच्या निखळ मैत्रीने अनेकांना हेवा सुद्धा वाटू लागला आहे.