नागपूर - पैशाच्या वादातून एका गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना खापरखेडा येथे घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. अश्विन शामराव ढोणे (वय, 30) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अश्विनविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी असलेल्या शुभमवर सुद्धा चोरीसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अश्विन आणि शुभममध्ये काही दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. तीन दिवसांपूर्वी सुद्धा याच कारणाने दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे शुभमने अश्विनला संपवण्याचा कट रचला.
त्यानुसार बुधवारी रात्री दहेगाव मार्गावरील दत्तनगर चौकात शुभम आणि त्याच्या साथीदारांनी अश्विनला बोलणी करण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावले. त्यावेळी पैशाचा वाद उकरून काढत आरोपींनी अश्विनचा गळा चिरून खून केला, आणि घटना स्थळावरून पळ काढला. याबद्दल माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने चारही आरोपींना अटक केली. शुभम पाटील, तुषार नारनवरे, शानु थापा अशी आरोपींची नावे आहेत तर यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलीस अधिक तपास करत आहेत.