नागपूर - काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे यांचे आज सकाळी काटोल येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू झाला त्यावेळी ते 86 वर्षांचे होते. आज सकाळी 9 वाजता आंघोळ करताना त्यांना भोवळ आली होती, त्यानंतर त्यांना काटोल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
1984 ते 1994 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते काटोल विधानसभेचे आमदार होते. दरम्यान, त्यांनी म्हाडाचे सभापती पद सुद्धा भूषविले होते. सुनील शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे. ते आमदार असताना 1990 च्या काळात शिंदे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी काटोल-नरखेड तालुक्यात शिक्षणाचे बीजारोपण केल्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.