नागपूर - शहरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात ही प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झालेले आहे. मतदानाकरीता एक तास अधिक दिल्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे बघायला मिळाले.
नागपुरात सकाळी ७ वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि सायंकाळी ६ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. पहिल्यांदा ११ तास मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. उन्हाचा तडाखा असल्याने मतदानाची टक्केवारी घटण्याची भिती होती. मात्र, उन कमी होताच नागरिकांनी मतदानासाठी एकच गर्दी केली. नागपूरमध्ये गेल्या वेळी ५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी हा टक्का ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. नागपूरकर मागील निवडणुकीचा रेकॉर्ड यंदाच्या निवडणुकीत मोडीत काढण्याती शक्यता आहे.
नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध पुर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसचे उमेदवार असलेले नाना पटोले यांच्यात लढत होत आहे. नागपूरचा गड राखने हे गडकरींसाठी आव्हान आहे, तर भाजपमधून नुकतेच काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांनी सुद्धा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे पटोले यांना गडकरींच्या विजयाचा रथ रोखण्याचा विश्वास आहे. गडकरी संघ भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने, त्यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ताकदीने उभा आहे. मात्र, नागपुरात गटा-तटात विभागलेले काँग्रेस नेते नानांच्या मागे एक दिलाने उभे राहिल्याने, नानाचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. आज मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे. मात्र, आता विजय कुणाचा होणार ते निकालाचा दिवसच ठरवणार आहे.